राजमाता जिजाऊ!

राजमाता जिजाऊ!



अखंड स्वराज्याची माता म्हणजे राजमाता जिजाऊ!

स्वराज्याचे दोन ढाणे वाघ छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज ज्यांच्या छत्रछायेखाली वाढले त्या राजमाता जिजाऊ!

ज्यांनी स्वराज्य उभारणीमध्ये बहुमुल्य साथ दिली आणि वेळोवेळी मार्गदर्शन केले त्या राजमाता जिजाऊ!

मुत्सद्दीपणा, नितीमत्ता आणि बुद्धिमत्ता यांचा सुरेख संगम म्हणजे राजमाता जिजाऊ!

माँसाहेब जिजाऊंबद्दल जेवढे बोलावे तेवढे कमीच! त्यांच्या महतीचे वर्णन करण्यास शब्दही अपुरे पडावेत. त्यांचे नाव जरी मुखातून निघाले तरी शरीर अगदी रोमाचून उठतं!


माता केवळ मायाळू नसून शक्ती असू शकते, याचे सर्वात मोठे उदाहरण जिजाबाई यांचे असावे. राजमाता जिजाऊ यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज घडवले. स्वराज्य संकल्पनेची बी मातेनेच आपल्या शिवरायांच्या मनात पेरली. ‘तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचे आहे’, असा प्रचंड आत्मविश्वास शिवरायांमध्ये निर्माण केला. तसेच त्यादृष्टीने बालपणापासूनच त्यांना तयार केले. आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन, व्यवस्थापन, मुत्सद्देगिरी, शस्त्रविद्या व पराक्रम अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू देणाऱ्या राजमाता!

ज्या वयात मुले खेळण्यात दंग असतात, त्या वयात जिजाऊ तलवारीची मूठ घट्ट पकडण्यात दंग होत्या. लष्करी प्रशिक्षणासाठी लखोजींकडे हट्ट करणाऱ्या जिजाऊंना शूरवीरांच्या कथा ऐकून स्फूरण चढे. म्हाळसाईंनी आपल्या लेकीला अशा कथा सांगून तिच्या शूरपणाला प्रोत्साहन दिले. शत्रूचे सरदार आया-बायांची अब्रु वेशीवर टांगत होते. मुलींचा लिलाव होत होता. स्वातंत्र्य कशाला म्हणतात, हे विसरून गेलेला समाज निमूटपणे सगळे अत्याचार सहन करत होता. शेतकऱ्यांची तर याहूनही वाईट अवस्था होती. पिकवावे आपण आणि कणगी मात्र बादशहाची भरावी. घाम गाळावा पण पोट भरू नये. समाजाची ही दयनीय अवस्था जिजाऊंना बघवत नव्हती. त्यांना या अन्याय-अत्याचाराविरुद्ध लढणारा वीर पाहायचा होता. पराक्रमी शहाजीराजांची ओढाताण जिजाऊ जवळून अनुभवत होत्या. आदिलशाही, निजामशाही, मुघलशाही इत्यादी शाहींमध्ये पराक्रम गाजवूनही त्यांचे असलेले दुय्यम स्थान जिजाऊंना जाणवत होते. ती सत्ता असली, तरी ‘तेथे’ मानसन्मान नाही, स्थिरता नाही, रयतेचे कल्याण नाही, याचे विचार जिजाऊंना सतत अस्वस्थ करीत होते.

मुजरा माझा त्या माँ जिजाऊला

घडविले तिने त्या शूर शिवबाला!!


साक्षात होती ती आई भवानी

जन्म घेतला तिच्या पोटी शिवानी!!


Published by Apeksha R.K

I am a Co-Author, Poet, Writer, Book Compiler, And performer. From India!

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started